Gandhi Darshan Shibir

 


Talk on Artificial Intelligence

Shri Vijay Tambe, Secretary, Sevagram Ashram Pratishthan delivered a talk on Artificial Intelligence in the Gandhi Darshan Camp by Maharashtra Gandhi Smarak Nidhi and Yuvak Kranti Dal on September 8, 2024 in Gandhi Bhavan, Kothrud, Pune. The text of the talk delivered by him was made available in the blog of Sevagram Ashram Pratishthan for wider dissemination. Dr.  Kumar Saptarshi, President,  Maharashtra  Gandhi Smarak Nidhi and founder Yuvak Kranti Dal, Shri Nirajan  takle Senior Journalist  also addressed the camp on Gandhian themes.




Text of the talk  delivered by Shri Vijay Tambe, Secretary , Sevagram Ashram Pratishthan on Artificial Intelligence  in the Gandhi Darshan Camp  by Maharashtra Gandhi Smarak  Nidhi and Yuvak Kranti Dal on September 8, 2024 in Gandhi Bhavan ,  Kothrud, Pune


कृत्रिम बुद्धिमत्ता

विजय  तांबे

 गांधी 150 च्या निमित्ताने ‘ लोकांचा गांधी लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ‘ आम्ही काही मित्रांनी सेवाग्राम कलेक्टिव नावाचा अनौपचारीक गट स्थापन केला. गांधी समज गैरसमज नावाची छोटी पुस्तिका प्रकाशित केली. हा विषय घेऊन आम्ही देशभरात फिरलो. लोकांचा गांधी कोणता हे सांगताना लोकांचे प्रश्न कोणते ?अफाट बेरोजगारीची कारणे कोणती ? यांचा शोध घेताना आम्हाला चौथ्या औद्योगिक क्रांतीचा शोध लागला. त्यातून पुढे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिश्यल इंटेलिजन्स म्हणजेच ए. आय.ची ओळख झाली.

 

एकंदर चार औद्योगिक क्रांत्या झाल्या. पहिली क्रांती आहे ती वाफेच्या इंजिनाची. विजेचा शोध ही दुसरी क्रांती. तिसरी म्हणजे संगणकाचा प्रवेश. चौथी औद्योगिक क्रांती म्हणजे ए. आय. आणि त्याच्या सोबत येणारे मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी, मशीन लर्निंग , थ्री डी प्रिंटर असं अजून खूप आहे. आज पर्यंतच्या तंत्रज्ञानाच्या विकासात ‘ कृत्रिम बुद्धिमत्ता ‘ हे शब्द प्रथमच आले आहेत हे आपण लक्षात ठेवायला हवे.

नक्की काय आहे कृत्रीम बुद्धिमत्ता. हे सुद्धा एक संगणक प्रणाली आहे. अतिशय अद्ययावत आणि वेगळ्या प्रकारची. कुठलेही अॅप तयार करतानात्याच्या कामाच्या सगळ्या शक्यता लक्षात घेऊनच त्याची संगणक प्रणाली तयार होते. म्हणजे हा प्रोग्राम जसा तयार केलंय तसेच ते अॅप काम करते. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन ती संगणक प्रणाली काम करत नाही. उदाहरणार्थ एका यंत्र मानवाला सफरचंद खायला शिकवायचे असेल तर त्याचा प्रोग्राम तयार करताना त्यातल्या बारीक सारीक हालचालींची क्रमवार नोंद करून त्याचा प्रोग्राम तयार केला की तो यंत्र मानव सफरचंद खाऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रमानवाला सफरचंद खायला सांगायचे  असेल तर त्यामध्ये खाण्याच्या सर्व पद्धती, वेगवेगळी फळे , त्यांची वैशिष्ट्ये , ते खायच्या पद्धती यांची माहिती भरायची. आणि समोर सफरचंद ठेऊन खायला सांगायचे. तो प्रथम काहीवेळा चुकतो. नंतर खायला लागतो. तो चुकतमाकत निर्णयापर्यंत पोचतो. म्हणजेच त्याचा प्रोग्राम वेगाने स्वत: मध्ये सुधारणा करतो. जसजसे प्रश्न समोर येतात तसा तो उपलब्ध माहितीच्या आधारावर अपग्रेड होतो. प्रगत होतो.

तो नक्की अपग्रेड कसा होतो ? आपल्याला हवा तसा की त्याला हवा तसा याचे उत्तर शोधायची वेळ आलेली आहे. बीबीसी चे जेष्ठ पत्रकार आशिष दीक्षित अमेरिकेतील एम आय टी मध्ये गेले होते. ए. आय. इंजिनियर आणि एक पत्रकार यांनी एका दिवसात एक चॅट बॉट तयार करायचा असा कार्यक्रम होता. दिवसभर काम केले. चॅट बॉट तयार झाला. प्रश्नोत्तरे झाली. शेवटी दीक्षितांनी त्याला देवनागरी लिपीत मराठी मध्ये प्रश्न विचारला. ए. आय.ने देवनागरीत  तोडक्या मोडक्या मराठीत उत्तर दिले. दीक्षितांनी इंजिनियरला विचारले ‘ हे आपण प्रोग्राम केलेले नव्हते तरी देवनागरीत उत्तर कसे आले ?’ इंजिनियर म्हणाला ‘ आत नेमके काय घडते ते सांगू शकत नाही.’(हे विधान किती सीरियस आहे हे सांगणे.)या आगळ्या वेगळ्या पद्धतीला न्यूरल नेटवर्क म्हणतात. ( थोडक्यात ते काम कसे करते ते सांगायचे ) याच सफरचंद खाणाऱ्या ए. आय. च्या यंत्रमानवाला इंटरनेट जोडले आणि नवनवीन प्रोग्राम करायची परवानगी दिलीत तर काय होईल? ही विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण .. नक्की होईल.

भारताच्या औद्योगिक उत्पादन क्षेत्रात ए. आय. ने  कधीच प्रवेश केला आहे. तिथे मशीनलर्निंग , इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी , रोबो सगळे ए. आय. आधारीत आहेत. पूर्वी अद्ययावत तंत्रज्ञान कितीही असले तरीही त्याची सूत्रे सजीव मनुष्य प्राण्याच्या हाती होती. मोठ्या मोठ्या कारखान्यात कामगारांची संख्या कमी होत असून गरजेप्रमाणे कंत्राटी पद्धतीने कामे होतात. भारतात कंत्राटी कामगारांची संख्या वाढली असून नियमित कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाले आहे असं आकडेवारी सांगते. आता गिगइकॉनमी नावाचा प्रकार सुरू झाला असून कष्टकऱ्यांच्या  शोषणाचा तो आधुनिक मार्ग आहे. त्याच्या बद्दल सविस्तर माहिती देणारा ध्रुव राठी यांचा विडियो काही दिवसांपूर्वी यूट्यूब वर आलेला आहे. तो आवर्जून बघा. ऑटोमेशन पूर्णत्वाला नेण्याचे काम ए. आय. ने केले.  हे मशीनलर्निंग , इंटरनेट ऑफ टेक्नॉलॉजी , रोबोटिक्स , थ्रीडीप्रिंटरयांची सुरस उदाहरणे आहेत मात्र सगळं वेळेअभावी सांगता येत नाहीय. हे सगळे शब्द युट्यूब वर लिहिलेत तर त्यांची कामे दृश्य स्वरूपात दिसतील.

 

मानवी इतिहासात जसजसे तंत्रज्ञान विकसित होत गेले, त्याचा पहिला परिणाम उत्पादन तंत्रावर आणि नवीन तंत्रज्ञान निर्माण करण्यावर जाणवला.  उत्पादन तंत्रात सुधारणा झाल्यावर उत्पादन अधिक वेगाने होते, अधिक नेटके आणि सुबक होते. त्यात अधिक नावीन्य असू शकते. त्याचवेळी ते उत्पादन  करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ उत्पादनाच्या प्रमाणात कमी होत जाते. प्रत्येक बदला नंतर मनुष्यबळ कमी होत गेले . मात्र त्याचवेळी दुसरी नवीन कौशल्ये निर्माण होतात आणि पर्यायी रोजगार निर्माण होतो. उदाहरण द्यायचे झाले तर वीजेच्या शोधानंतर यंत्रे वेगात फिरू लागली. त्याचवेळीवायरमन , इलेक्ट्रिशियन या सारखे नवीन रोजगार निर्माण झाले. तसंच ए. आय. च्या आगमनानंतर होईल,ही स्थिती अवस्थातराची आहे, असं म्हंटलं जात आहे. ते तपासून बघू.

तर तंत्रज्ञानाच्या विकासातून उत्पादन तंत्र बदलतराहिले. त्यातून मनुष्यबळाची कपात झाली ती कारखान्यांतून झाली. म्हणजे कामगार , तंत्रज्ञ हळूहळू कमी झाले. त्यांची जागा संगणकावर आधारीत यंत्रांनी घेतली. संगणकावर काम करणारी माणसे होती. यानंतर उत्पादक कारखान्यांचा प्रवास ऑटोमेशनच्या दिशेने गेला. त्याला वेग प्राप्त झाला, ऑटोमेशन पूर्ण झाले ते ए. आय. मुळे . संगणकांना आज्ञा देण्यासाठी आता माणसांची गरज राहिलेली नाही. ती जबाबदारी आता ए. आय. ने  घेतली आहे. म्हणूनच आपल्या आसपासच्या मोठ्या कारखान्यात कोणी शॉपफ्लोरवर कामाला लागल्याचे ऐकिवात नाही. आपण पुण्यात आहोत. इथे मोठे मोठे कारखाने आहेत. पूर्वी यांचा भाऊ किर्लोस्करमध्येलागलाय ,दुसरं कोणतरीबजाजमध्येजॉइनझालंयअसं ऐकायला येत असे. हे कारखाने अजूनही आहेत. आता फक्त आयटी मधल्या नोकऱ्यांबद्दल ऐकायला येते.

चौथी औद्योगिक क्रांती हा शब्द वर्ल्ड इकनॉमिकफोरमचे अध्यक्ष क्लाउजश्लोफ प्रथम मांडला. त्यांच्या पुस्तकात त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की प्रत्येक औद्योगिक क्रांतीनंतर कोणते नवीन रोजगार निर्माण होतील हे स्पष्ट दिसत होते. मात्र चौथ्या औद्योगिक क्रांतीत नक्की कोणते नवीन रोजगार निर्माण होतील हे स्पष्ट मांडता येत नाही. तसेच निर्माण झालेले रोजगार किती टिकतील हे ही सांगता येत नाही. कारण यापुढे तंत्रज्ञान बदलांचा वेग अफाट असणार आहे. या वेगाचा परिणाम काय असेल ते आताच सांगता येत नाही.

 

गेल्या दोन वर्षातील घटना म्हणजे एक नवीन चॅटबॉट आले. चॅटजीपीटी . पहिलं नुसतंचॅटजीपीटी,नंतर त्याच्या नवीन व्हर्जन आल्या चॅटजीपीटी 2,3 आणि सध्या आहे 4. ते काय करतं ? शब्दांसंबंधी तुमचे कोणतेही काम ते करतं. यांच्या तीन सुरस कहाण्या :

आदित्य गोविलकरने  लिहिलं की दक्षिण ध्रुवावर मी मुंबईची पाणीपुरी आनंदात खातोय अशी मला कविता हवीय. काही सेकंदात त्याला इंग्रजीत कविता मिळाली. औरंगाबाद शहराच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात ए. आय. काय मदत करू शकेल असा प्रश्न प्रदीप खेलूरकरने  विचारला आणि त्याला व्यवस्थित टिपण मिळाले. त्यामध्ये औरंगाबाद शहरातील कोणत्या विभागातून किती वाजता कचरा उचलण्यात येतो. या वेळा नमूद करून ए. आय. द्वारे लोकांना आणि कचरा उचलणाऱ्यांना कसे मेसेज जातील आणि हे काम कसे लवकर होऊन शहर अधिक स्वच्छ राहीलहे सविस्तर मांडले होते. तिसरी गोष्ट आहे, जेफ्रीहिंटन यांची. ही चॅटजीपीटीची नाही. बार्डम्हणजे आताच्या जेमिनी बद्दल आहे. त्यांना ए. आय. चेगॉडफादरम्हंटले जाते. 60 मिनीट्स या यूट्यूबचॅनल वर त्यांनी एक प्रात्यक्षिक दाखविले. त्यांनी सहा शब्द लिहिले. BABY SHOES NEWLY PURCHASED NEVER WORE. यावर आधारीत गोष्ट मागितली. काही सेकंदात गोष्ट तयार होऊ लागली. नवविवाहीत जोडपे आहे. बायको गरोदर आहे. म्हणून नवरा कौतुकाने बाळाच्या स्वागतासाठी सगळे कपडे, स्वेटर ,बूट घेऊन येतो. मात्र अघटित घडते. बायकोचे मिसकॅरेज होते. ही जवळजवळ 200 ते 250 शब्दातली , अतिशय चांगले वर्णन आणि ऊतमव्यक्तिरेखा रंगवलेली ही गोष्ट होती. चॅटजीपीटी अजून खूप कामे करते. तुमचा अभ्यास , पीएचडीथीसिस , पिपीटी तयार करणे काय वाट्टेल ते काम ते करू शकते. खऱ्या अर्थाने शब्दांतले काहीही करते. तसेच प्रतिमा आणि चित्रांबाबत काहीही करू शकणारे त्यांचे भाऊ आहेत. एकाचे नाव आहे मिडजऱ्नी. तुम्हाला चित्र कसं हवं आहे आणि कोणत्या शैलीत हवे आहे ते लिहायचं किंवा कमांड द्यायची. त्याला प्रॉम्प्ट देणे म्हणतात. तुम्हाला हवंतसं चित्र आणि त्यांचे दोन तीन पर्याय ही मिळतात. पिकासो, दाली, गॉग किंवा कोणाच्याही शैलीत काय हवं ते तुमच्या प्रॉम्प्ट प्रमाणे मिळते. आता येणारे चॅटजीपीटी 5 हे शब्द आणि प्रतिमा दोघांचे मिळून आहे. एखाद्याच्या प्रतिमा आणि आवाज मिळाला की हवं ते करता येईल. अगदी जुनी नटी मधूबाला आणि सध्याचा नट राजकुमार राव यांचा एक सिनेमा निघू शकेल. एवढ्या सुरस कहाण्या झाल्या. आता एक मत सांगतो. युवालनोहा हरारे हे नाव आपण सगळ्यांनी ऐकले असेलच. त्यांच्या मते आताचा ए. आय. ही तर फक्त सुरवात आहे. जीवसृष्टीच्या अगदी  सुरवातीला एकपेशीय प्राणी अमीबा होता. तसा आजचा ए. आय. आहे.

 

कुठलेही तंत्रज्ञान हे उपयुक्त असतेच. त्याशिवाय ते निर्माणच होत नाही. कारण त्याच्या उत्पादनाचा खर्च आणि त्यावरील फायदा वगैरे धरून किंमत तयार होते. आणि त्या किंमतील ते तंत्रज्ञान विकले जावे लागते. अधिकाधिक सुखकारक , उपयुक्त आणि सोयीचे असावे लागते. ते विकण्यासाठी जाहिरात, बाजार, मार्केटिंग हे सगळं येतंच. तसंच ए. आय. हे खूपच म्हणजे अतीचसुखकारक तंत्रज्ञान आहे. आता सुखाची भीती वाटायचे दिवस सुरू झाले आहेत.

आपण जॉबलेसग्रोथ हा शब्द नक्कीच ऐकला असेल. अर्थ खूपच स्पष्ट आहे. रोजगाराशिवाय विकास. या शब्दांमुळे वाढता जीडीपी  आणि कमी होत  जाणारा रोजगारचा दर या दोन्हींचा संबंध जोडणे आपल्याला सुलभ होते. उत्पादन वाढणे म्हणजे रोजगारात वाढ होणे. म्हणजे जीडीपी वाढला म्हणजे रोजगार वाढायला हवा. अंदाजे गेली 25 वर्षे तरी हे चित्र उलट दिसत आहे. हाच काळ ऑटोमेशनच्या बहराचा काळ आहे. आज आपण ए. आय. च्या जमान्यात आहोत. आधी ऑटोमेशनने कामगारांची गरज संपत आली. आता ए. आय. ऑफिस मधील नोकऱ्या संपविणार आहे. आपले अनेक पांढरपेशे मध्यमवर्गीयलवकरच बेरोजगार होतील. याच्यावर नेमके आणि थोडक्यात मत मांडले आहे अभिजीत बॅनर्जी यांनी. World knowledge forum च्या यूट्यूबचॅनल वर future of inequality या विषयावर त्यांचा विडियो आठ दिवसांपूर्वीच आलेला आहे. तो जरूर ऐका. ही जॉबलेसग्रोथ लवकरच शेतकरी आणि मध्यमवर्गीयांनाग्रासणार आहे. यापुढे किती टक्के कामांचे अस्तित्व नष्ट होईल, किती कामांचे स्वरूप बदलेल आणि किती कामे टिकून राहतील यांची जगभरची आकडेवारी आपल्याला इंटरनेट वर उपलब्ध आहे. वाचू लागलो की धक्के बसतात. ( 58%, 35%, 7%)

तंत्रज्ञानाचे अजून एक वैशिष्ट्य आहे. संपत्तीचे केंद्रीकरण . दरवर्षी प्रकाशित होणारे Oxfamचे अहवाल आपल्याला विषमतेची आकडेवारी देतात. गेल्या शंभर वर्षातली ही सर्वात जास्त विषमता आहे असं म्हंटलंजातंय. संपत्तीच्या केंद्रीकरणाचामहत्वाचा तोटा म्हणजे आम जनतेची खरेदीची शक्ती कमी कमी होत जाते. याचीही आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे. हे तपासण्यासाठी किराणा मालाचे दुकान सोडून कोणत्याही दुकानदाराला भेटून विचारा. तो हेच सांगतो. कोणी म्हणेल की ऑनलाइन विक्री वाढली आहे. म्हणजे पुन्हा संपत्तीच्या केंद्रीकरणात भर. छोट्या दुकानदारांचा फायदा amazon किंवा फ्लिपकार्ट ला मिळणार. मात्र एकंदर खरेदीची क्षमता कमी झाली आहे . असे कमी होणे हे बऱ्यापैकीधोकादायक असते. बाजारात माल पडून राहतो. त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. शेवटी परिणाम रोजगारावर होतो. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सामान्य माणसाची खरेदीची क्षमता वाढविणे हाच उपाय असतो.

ऑटोमेशन जोरात असतानाच नोटबंदीचा प्रयोग झाला. त्यानंतर दूसरा प्रयोग जीएसटीचा झाला. दोन्हीचे भयानक परिणाम असंघटित उद्योगावर झाले. आपल्या अर्थव्यवस्थेत असंघटित उद्योगांचा वाटा लक्षणीय आहे. तिथेच फटका बसला. कोरोनाने शेवटचा आघात केला. या सगळ्यातून उत्पादनाच्या साखळ्या तुटल्या. त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसला. पराकोटीची विषमता वाढली. कोरोनाच्या काळात वरच्या 1% लोकांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. आजही जीएसटी मध्ये भारतातल्या दरिद्री माणसाचा वाटा अधिक आहे मात्र अर्थव्यवस्थेत त्याप्रमाणात वाटा नाही. असो. हा दूसरा विषय आहे. कुठल्याही व्यवस्थेत राजकीय व्यवस्था विकेंद्रीत आणि अर्थव्यवस्था केंद्रित असं होत नसतं. आपली राजकीय व्यवस्था ही वेगाने केंद्रीकरणाच्या दिशेने जात आहेच.

आता ए. आय. च्या दुसऱ्या परिणामांकडे बघू. चॅटजीपीटी या चॅटबॉटचा परिणाम काय होऊ शकतो यांचा विचार करू. पूर्वीच्या काळी एखादा विषय घेऊन संशोधन करायचे असेल किंवा अभ्यास करायचा असेल तर तज्ञांचा सल्ला घेणे, लायब्ररीत जाऊन पुस्तके शोधणे, टिपणे काढणे, पाहणी करणे, त्या सगळ्यातून आपला विचार विकसित करणे असे होत असे. त्यातून मेंदूला त्रास होऊन प्रगल्भता वाढत असे. संशोधकाला वैचारीक समाधान मिळत असे. नंतर गुगल आले. कोणत्या विषयाचे काय वाचावे, त्या विषयाची इतर माहिती गुगल देऊ लागले मात्र पद्धती जवळपास तीच राहिली. आता असलं काहीच करायची गरज नाही. संशोधनाचा विषय लिहा . आणि कमांडद्या. प्रबंध तयार. समजा नाही आवडला. तर कसा हवा याची कमांडद्या. पुन्हा नवीन लगेच तयार. सध्याच्या  विद्यार्थ्यांच्या उत्तराचा स्त्रोत काय हे कॉलेजचे प्राध्यापक सांगू शकतील. या चॅटजीपीटीची अनेक भावंडे बाजारात आहेत. पुढे अजून नवनवीन येतील. आपला माल खपवायला आधीच्यापेक्षा अधिक प्रगत आणि अधिक सुखकारकचॅटबॉट ठेवण्याची ते काळजी घेतीलच. भावी काळात मेंदूला ताण देऊन विचार करण्याची , अनेक पर्यायातून एक पर्याय निवडण्याची, विविध पर्यायांचा एकाच वेळी विचार करण्याची आपल्याला गरज लागणार नसल्याने त्या क्षमता आपण गमावून बसू. तसेच आपल्या अभिव्यक्तीवर मर्यादा येईल. कारण आपण अनेक शब्दांचा वापर करणे,सविस्तर लिहिणे कधीच सोडलेले आहे. काही वेळ सलग वाचणे आणि  ऐकणे या क्षमता सुद्धा आपण हरवून बसलो आहोत. आपण आज सुद्धा शब्दांच्या वापरापेक्षा ईमोजीवर भर देण्याची प्रवृत्ती वाढत आहे. जेंव्हा विश्लेषक विचार करणे कमी होते, शब्द कमी होत जातात आणि जगण्याच्या अस्तित्वाचे प्रश्न समोर उभे राहतात. त्यावेळी त्या प्रश्नांना प्रतिसाद कसा द्यायचा हे उमजत नाही. तो बेरोजगार तरुण त्यावेळी फक्त सैरभैर अवस्थेत असतो. हे सगळे का घडत आहे याचा सारासार विचार करून आकलन करून घेणं त्याच्या आवाक्या बाहेरचं होतं. तो सोपी उत्तरे शोधतो. त्याचवेळीसमाजमाध्यमे त्याला उथळ आणि थिल्लर विचार करायला मदत करत असतातच. त्याला आधार द्यायला झेंडे, त्यांचे रंग, आणि त्याचे धर्म आणि जात असतात. मग तो सोपी उत्तरे शोधतो. सगळे कोणामुळे होते?मुसलमान. सगळ्याला कोण जबाबदार? ब्राम्हण. सगळे प्रश्न सोडवायला एकाच उत्तर ! राखीव जागा. आपले आदर्श आपल्या अस्मिता बनतात . त्या अस्मितेसाठी काहीही करायला तरुण तयार होतात. काही वर्षांनी हे तरुण  निराश आणि खचलेले आढळतात.

अस्मितेमध्ये विविधता असते. त्यातून सामाजिक अशांतता निर्माण होते. मुळात अस्मिता हेच संस्कृतीचे विकृत रूप आहे. त्यामुळे अक्राळविक्राळ तंत्रज्ञान अस्मितेची विविधता सपाट करून टाकते. कारण कुठल्याही विविधतेचा पाया हा विकेंद्रीत आहे केंद्रीकरण नव्हे. संपत्ती आणि सत्तेचे केंद्रीकरण आणि संस्कृतीचे सपाटीकरण ही फासिस्ट विचारांसाठी सुपीक भूमी आहे. बेरोजगारांचा आवाज बंद करायला एका मर्यादेपर्यंत अस्मितेचे राजकारण पुरेसे असते. मात्र त्यांच्या पुढे दैनंदिन खाण्यासाठी भाकर तुकडा टाकावाच लागतो.

हा भाकर तुकडा म्हणजे युनिव्हर्सलबेसिकइन्कम. जगात आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी यांचे प्रयोग झाले. ते प्रयोग करणाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांचे रिजल्ट खूप चांगले आहेत. थोडक्यात असे आहे की आता तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे त्यामुळे  माणसाला काम करण्याची गरज नाही. त्याला सरकार दर महिना ठराविक रक्कम देईल. त्या माणसाने पोटापाण्याचा विचार सोडून कला संगीत आणि साहित्यात रमावे. वाटल्यास आपली कौशल्ये अधिक विकसित करावीत. जीवन अधिक समृद्ध बनवावे. मी याच्याकडे असं बघतो की तू कितीही शिकला असलास किंवा शिकलेला नसलास तरीही इथे तुला रोजगार उपलब्ध  नाही. या व्यवस्थेला तुझी गरज नाही. पण आम्ही तुला ठार मारू शकत नाही. म्हणून तुला मरेपर्यंत जगण्यासाठी आम्ही पैसे देत आहोत. मनुष्य श्रम करतो, उत्पन्न मिळवितो, कुटुंबाचे पोट भरतो हे आत्मसन्मानाचे जगणे असते. श्रम करणे, त्यातून संपत्ती निर्माण करणे यातूनच माणसाचे माणूसपण घडत जाते. समाजातील श्रीमंतांपासून गरीबापर्यंत सर्वांकडे स्वत:चा आत्मसन्मान असतो. सगळ्यांचा आत्मसन्मान योग्य प्रकारे सांभाळला गेल्यास समाजाचा गाडा सुरळीत चालतो. याचे उदाहरण म्हणजे .. मराठवाड्यातीलदुष्काळी भागातून पश्चिम महाराष्ट्रात लाखोंऊसतोडणी कामगार दरवर्षी येतात. कामासाठी येताना आणि परतताना ते गरीबच असतात. त्यांचे शोषण होत असते. पण या लाखोंऊसतोडणी कामगारांना आपण दरोडे घालून पैसे मिळवावेत असं वाटल्याचे ऐकिवात नाही. कारण आत्मसन्मानाच्या रोजगारात ते आपली प्रतिष्ठा मिळवितात. हा आत्मसन्मान युबीआय मध्ये मिळेल का? माझी समाजाला गरज नाही, मी कुठल्याही अर्थाने उपयुक्त नाही अशी जाणीव राहिल्यावर मनुष्य साहित्य, संगीत, कलेत रमू शकेल का? मी खूप अतिशयोक्त बोलत आहे असे वाटल्यास जरा डोळे उघडे ठेऊन आसपास पाह्यले तर उदाहरणे दिसू लागतील. लाडकी बहीण योजना ही त्याचीच एक भाग आहे. फुकट पैसे घेण्याची सवय लावण्याची ही सुरवात आहे. हीच योजना भारतील दहा राज्यात वेगवेगळ्या नावाने चालत आहे.

थोडक्यात या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या  परिणामांची  उजळणी करू. मानवाला खूप म्हणजे खूपच सुखसोयी मिळणार आहेत. त्यामुळे त्याला जास्त विचार करण्याची गरज नाही. उत्तरे शोधण्यासाठी डोक्याला त्रास द्यायची गरज नाही. त्यामुळे शब्दांची गरज लागणार नाही अशी स्थिती निर्माण होईल. ईमोजीनी आता सुरवात केली आहेच. शब्द कमी झाल्यावर नेमका विचार करायची शक्ती सुद्धा हळू हळू कमी होईल . तंत्रज्ञानाने खरे आणि खोटे यातील सीमारेषा पुसून टाकलेली आहे. त्याचा राजकीय वापर सुरू झाल्यावर काय होईल यांची कल्पना करणे कठीण आहे. संपत्ती आणि सत्तेच्या केंद्रीकरणाने विषमता आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर होणार. संस्कृतीचे सपाटीकरण होणार.  पण त्यावर विचार करण्याची क्षमता मनुष्य हरवून बसेल. अजून एक मुद्दा म्हणजे तंत्रज्ञानाने समता, स्त्री पुरुष समता येईल हा गैरसमज आहे. तंत्रज्ञान विकण्यासाठी समाजाची आहे ती परिस्थिती गोंजारून, गोड गुलाबी करून व्यापाऱ्याना माल विकायचा असतो. एक छोटे उदाहरण सांगतो. ए. आय. आधारीत दहा रोबोमॉडेल तयार केली गेली. त्यातल्या नऊ  महिला होत्या. त्या महिला दिसायला सुंदर, आकर्षक शरीरयष्टी आणि छान छान कपडे घातलेल्या होत्या. रिसेशनिष्ट , दुकानात माल विक्री करणाऱ्या, गाड्या विक्रीच्या दुकानात काम करणाऱ्या , थोडक्यात स्त्रीचे सौन्दर्य जिथे विक्रीला सहाय्य करते अशा सगळ्या स्त्रीया होत्या. दहावा रोबो पाणबुड्या होता. समुद्रातील सगळी कामे करणारा. तो पुरुष होता. त्याला सजवला नव्हता.

सहसा पुरोगामी मंडळी म्हणजे मार्क्सवादी, समाजवादी, आंबेडकरवादी , गांधीवादी , सर्वोदयवादी असतात. अजूनही कोणी असतील. माणसाची विचार करण्याची गरज नसणे, खरे खोटे यातील सीमा पुसल्या जाणे, कष्टाशिवाय पैसे मिळणे हे प्रश्न पूर्णपणे नवीन आहेत. कार्ल मार्क्स ते आंबेडकर ते विनोबा यांच्या पुढे हे प्रश्न नव्हते. जे आज आपल्यापुढे ठाम उभे आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास  , हिंसक वृत्ती इत्यादि अनेक संबंधित विषयांवर मी वेळेअभावी मांडत नाहीय. मात्र समोर उभे असलेल्या प्रश्नांसाठी आपल्याला नवीन उत्तरे शोधावी लागतील. वरच्यापैकी कोणताही वाद यांची रेडिमेड उत्तरे देणार नाही. मात्र ही उत्तरे शोधण्यापूर्वी आपण कुठे आहोत, आपली मानसिक स्थिती काय आहे ते बघू या.

आज आपण संसदीय लोकशाही व्यवस्थेत आहोत. त्यात काही सत्ताधारी असतात. काही विरोधक. अजून काही असतात ते जनतेचे प्रश्न घेऊन लढत असतात. काही एनजीओवाले असतात. असे अनेक घटक असतात. या सर्वांमध्ये एक समान सूत्र असते. जे काही करायचे ते सरकारने करावे.

जनतेचे प्रश्न घेऊन लढणारेसरकारवर दबाव आणतात. विरोधक त्यांना बहुदा मदत करतात. सत्ताधारी सत्तेचा तोल सांभाळत निर्णय घेतात. या सगळ्यात एक गोची आहे ती बहुतेक पुरोगामी ओळखू शकलेले नाहीत. सरकारने सरकारच्या नियमाप्रमाणे काम करून त्यांच्या नियमांच्या चौकटीत प्रश्न सोडवावे अशी मागणी असते. तेंव्हा आपल्याला सरकारची चौकट मान्य असल्याचे, म्हणजेच आहे ती व्यवस्था मान्य असल्याचे आपण एक प्रकारे कबूल करतो. त्यात जी काही कमतरता , आळशीपणा जो काही आहे तो दूर व्हावा म्हणून आपण लढतो. यांचे उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात पुरोगामी लोकांनी शाळा स्थापन केल्या. लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून खटपट केली. कमतरता भरून काढली. पण आपण शासकीय शिक्षणाचीच चौकटच मान्य केली. शिक्षणाचा विचार वेगळ्या पद्धतीने करून काम करणाऱ्या शाळा महाराष्ट्रात फारच कमी आहेत. आपण सर्वजण स्वत:ला व्यवस्था परिवर्तनवादी म्हणतो आणि दुसरीकडे आहे ती व्यवस्था बळकट करण्याचे काम करतो. या मध्ये विरोधाभास आहे हे आपल्याला काळात नाही. लोकशाही पद्धतीत सगळी कामे सरकारने करावी ही मागणी मनात ठसलेली असल्याने आपल्यातली कल्पकता, सर्जकता आणि चौकटी बाहेरचा विचार करण्याची क्षमता आपण हरवून बसलो आहोत. म्हणून आजचे शिक्षण हे पाठांतरांचे आहे. सर्जकता, कल्पकता इथे ठेचली जाते. तरीही आपण दुसऱ्या प्रकारे प्रयोग केलेच नाहीत. नुसत्या आपल्या शाळा स्थापन करून व्यवस्था परिवर्तन होत नाही. शिक्षणासंबंधी मूलभूत विचार करून प्रयोग करावा लागतो, हे नउमगण्याचे कारण आपण जे हरवून बसलो त्यात आहे.

बहुतेक सर्व पुरोगामी मंडळींचे एक समान लक्षण आहे. त्यांना कोणतरी शत्रू लागतो. त्याशिवाय त्यांना जमत नाही. कोणाच्या तरी विरुद्ध बोलावे लागते. हा एक प्रकारे सोपे उत्तर शोधण्याचा प्रकार नव्हे काय? आपण आपली मूल्येन सोडता सर्वसमावेशक कधी होणार ? संवादाच्या वेगळ्या शैलीचा शोध घेणार आहोत का? कदाचित इथे मन स्वच्छ असेल तर गांधी आणि साने गुरुजीचे साहित्य मदत करू शकेल.

दुसरे म्हणजे आपल्याला कोणत्यातरी पुस्तकाचे, नेत्याचे नाव घेऊन बोलावे लागते. त्याशिवाय ते विधान निरर्थक होते असे आपल्याला वाटते. आपण आपले विचार लोकांना सांगताना विचार म्हणून सांगावे. त्याने ते विचार म्हणून समजून घ्यावे किंवा विरोध करावा. त्यावर चर्चा करावी. पण कोणतरी सांगतो, कोणत्यातरी पुस्तकात लिहिले आहे म्हणून तू ऐकायला हवे हे मला चुकीचे वाटते. 

 

प्रश्न नवे आहेत. रेडिमेड उत्तरे नाहीत. मात्र आपल्या मूल्यांवर आपला विश्वास आहे. आपल्याला समाज बदलण्याच्या प्रेरणा आहेत. संपत्तीचा ओघ तळात शेवटपर्यंत न्यायचा आहे. आपल्याला जातीभेदनकोयत. धर्माधर्मांतली भांडणे नकोत. विविधतेने नटलेला सहिष्णु आणि समतेच्या दिशेने जाणारा भारत देश आपले स्वप्न आहे. त्यासाठी आपली त्यागाची तयारी आहे. आज जे घडत आहे त्यामुळे आपण प्रचंड अस्वस्थ असल्याने पुन्हा एकदा नीट विचार करण्याची गरज आहे.

 

सध्या मी सुद्धा या अस्वस्थतेतून जात असल्याने मी काय विचार केला हे मांडून बोलणे थांबवितो.

1.  उत्पादन साधनांची मालकी कोणाकडे आहे हे महत्वाचे नसून मला उत्पादन तंत्र महत्वाचे वाटते. विधान चर्चेला घेता येऊ शकते. मात्र एक नक्की की उत्पादनतंत्र अत्याधुनिक नसेल तर अडाणी अंबानी निर्माण होऊ शकत नाहीत. तसेच आताच्या असंघटित क्षेत्रातील मालक आणि मजुरांमधील उत्पन्नाच्या विषमतेचे प्रमाण ठराविक आहे. फार भयानक तफावत नाही. 

2.  समाजाच्या वरच्या थरातून सुख समृद्धी पाझरतखालपर्यंत पोचते अशी पारंपारीक धारणा असल्याने वरती संपत्ती आणि सवलतीओतल्या गेल्या पण त्या खालपर्यंत पोचल्याच नाहीत. खालून वरती कसा विकास होईल यावर नीट मंथन करायची गरज आहे. त्याचे कार्यक्रम तयार  करावे लागतील. त्यातून नवीन मागण्याही तयार होतील.

3.  सर्व पुरोगामी चळवळींनी उद्यामशीलतेला म्हणजे आंतरप्रूनरशिपकडे दुर्लक्ष केले. कदाचित दुसवास केला. आज रोजगारस्नेही आणि पर्यावरणपूरक उद्यमशीलता घडविण्याची वेळ आली आहे. या प्रयत्नात आपल्या परिसरातील कौशल्ये कोणती, नैसर्गिक संसाधने कोणती त्यातून काय निर्मिती होऊ शकेल, कोणती नवीन कौशल्ये शिकावी लागतील या सगळ्याचा शास्त्रीय अभ्यास करून पर्यावरणपूरकरोजगारस्नेही उद्योग उभारावे लागतील. असे प्रयोगभारतात वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. या कामात गावातील सर्व जाती धर्मातील लोकांना जोडून घेतले तर ग्रामीण भागातील दंगल आणि विद्वेषाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल.

4.  आपण ज्या वस्तू वापरतो, त्या वस्तूंच्या उत्पादनतंत्राला आपण मान्यता देत असतो. त्यामुळे वस्तू वापरताना विचार करावा लागेल. तसेच आपण एकूण किती वस्तू वापऱ्यावयात. प्रत्येक खरेदीच्या वेळी गरजा, आरामदायी आणि हव्यास यातले आता आपण काय करतोय याचा विचार करावा लागेल. जो आपल्या गरजा कमी ठेवतो तो प्रतिष्ठीत . अशा प्रतिष्ठेच्या कल्पना रुजवायला हव्यात. त्यासाठी समाज माध्यमांचा वापर करावा. खरे तर प्रतिष्ठेच्या नवीन कल्पना रुजविण्याची चळवळ उभी रहायला हवी. मिनीमलीझम नावाची चळवळ जगभर चालू आहे. ते स्वत:ची जीवनशैली बदलतात. त्याचा समाज माध्यमावर प्रचार करतात. आपण गांधीजींच्या देशातले असून आपल्याला हे सुचत नाही.

5.  सरकारकडे मागणी करण्याची आंदोलने करूच नये असे माझे म्हणणे नाही. खूप टाळले तरी काही निर्णय सरकार घेणारच. तिथे मागणी करणे आलेच. आपली मागणी काय असेल ते  महत्वाचे आहे. झिरपण्याच्या सिद्धांताच्या विरुद्ध विकास खालून वरती नेण्यासाठी कोणत्या योजना हव्यात. त्याचे मागण्यात कसे रूपांतर करावे. त्यासाठी जनतेचा दबाव कसा करावा यांची आखणी करावी. मानवी विकासाच्या प्रवाहात उत्पादन केंद्रे ग्रामीण भागात होती. शहरे ही वितरणाची केंद्रे होते. आता शहरे ही उत्पादन आणि वितरणाची केंद्रे झाल्याने गोंधळ झाला आहे. भारतातील ग्रामीण भागात जी उत्पादने घेता येतात , त्यांचे उत्पादन शहरात करू नये. अशी आपण मागणी करू शकतो का? अर्थात अशी मागणी करण्यापूर्वी आपल्याला आपल्या जीवनशैलीत योग्य तो बदल करावा लागेल तरच मागणीला अर्थ प्राप्त होईल.

6.  या पुढचा काळ असा आहे की तुमचा धर्म कोणता हे तुम्हाला सांगावे लागेल. मी धर्म मानत नाही, धर्मा पलिकडली भूमिका घेतो असे जनतेला न समजणारे बोलून चालणार नाही. तुम्ही या पुढे, धर्म मानत नसाल तर आपापल्या छोट्याश्या गटाच्या पुढे जाऊ शकणार नाही. आपल्याला आपली  धार्मिक भूमिका ठरवावी लागेल. खरा धर्म कोणता इथपर्यंत चर्चा न्यावी लागेल. पुढची लढाई ही धर्मांध विरुद्ध खरा धर्म अशी होणार आहे. त्यावेळी आपण कसे वागणार,आपली भूमिका,आपली मांडणी कशी असेल यावर सखोल चर्चा सुरू व्हायला हव्यात.  धर्मांध विरुद्ध धर्म न मानणारे अशी लढाईच होऊ शकत नाही. कारण धर्म न मानणारे अधिकाधिक आक्रमक होऊन बोलावेत हीच धर्मांधांचीआंतरीक इच्छा असते. धर्मावरचे हल्ले हे धर्माधांच्या फायद्याचेच असतात.  

 

ए. आय. मुळे जी संस्कृती निर्माण होणार आहे ती मान्य करणे किंवा अमान्य करणे असे दोनच मुद्दे राहतात. तडजोड करायला गेलात की तुम्हाला त्याने कधी खाऊन टाकलं आहे ते कळणार पण नाही. ए. आय. ची संस्कृती अमान्य करायची असल्यास आपल्याला नवीन संस्कृतीची पायाभरणी करावी लागेल. नवे मानदंड उभे करावे लागतील. तसेच आलेले तंत्रज्ञान घालवून देता येत नाही. ते आपल्यासाठी कसे वापरायचे यासाठी कल्पकता आणि लवचिकता हवी. उदाहरण आमच्या वर्ध्याच्यागोरसपाकचे आहे. गांधी विनोबा काळापासून उत्पादनपद्धती  तीच आहे. बदल नाही. मात्र वितरण करण्यासाठी त्यांनी amazonची मदत घेतली.

 

ए. आय. चा विचार करताना गांधीजींची आठवण येणे अपरिहार्य आहे. स्वातंत्र्य आंदोलनात पाश्चिमात्य संस्कृतीला ठाम नकार देणारा हा पहिला माणूस आहे. पर्यायी संस्कृती उभारण्यासाठी त्यांनी अनेक संस्था निर्माण केल्या. धार्मिक परिभाषा होती मात्र विचार पुरोगामी होते. जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करत त्यांनी नवीन विचार मांडला. त्यांचे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने सर्जक होते. त्यानी जे प्रयोग केले तेच प्रयोग आपण परत  रिवाजाप्रमाणे करणे चुकीचे आहे. आपल्या मूल्यांवर आधारीत नवीन प्रयोग करावे लागतील. सर्जकतेने, कल्पकतेने उत्तरे शोधावी लागतील. चौकटी तोडून वेगळा विचार करावा लागेल. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक अशा अनेक पातळ्यांवर एकाच वेळी कामे करावी लागतील. त्यासाठी आपल्याडेटासायंटिस्ट पासून नाट्य दिग्दर्शकापर्यन्त सर्वांना जोडून घेऊन सर्वसामावेशक व्हावे लागणार आहे. कारण आपल्याला नवीन संस्कृती घडवायची आहे.

************************  

 

 

 

 


Comments

Popular posts from this blog

Positive Power Dynamics

Allowance for the upkeep of Gandhi as a State Prisoner in 1930

Mahatma Gandhi: Kaalavum Karmaparvavum 1869-1915 New book in Malayalam